नमस्कार त्रयोदशि


महारुद्र जे मारूति रामदास ।
कलीमाजिं जे जाहले रामदास ।|
जनां उध्दराया पुन्हा प्राप्त होती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १॥

महाराष्ट्रिं या माणगंगातिरातें ।
असे पुण्य गोंदावले क्षेत्र तेथें ।|
यजुर्वेदि विप्रगृहीं जन्म घेती
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ २॥

न लिंपे कदा बालक्रीडाउपाधी ।
विवेके सदा ज्ञान वैराग्य साधी ।।
जया सद्गुरुभेटिची होय स्फूर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ३॥

समर्थानुयायी तुकाराम सिध्द ।
जया पूर्ण वैराग्य अध्यात्मबोध ॥
तया प्रार्थुनी राममंत्रासि घेती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ४॥

तपें तोषिला सद्गुरू ज्ञानियांचा ।
वदे वाढवीं पंथ या राघवाचा ।।
कलीमाजी मंदावली धर्मभक्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ५॥

विदेहापरी चालवोनी प्रपंचा ।
मुमुक्षूजनांलगि अध्यात्मचर्चा ।।
करोनी बहु लोक ते मेळवीती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ६॥

जशी माउली ग्रास देते मुलाला ।
तसे बोधुनि ज्ञान पाजी जनांला ।।
धरेसारिखी ज्यां वसे नित्य शांति ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ७॥

किती प्रार्थिती कामना पूर्ण व्हाया ।
किती भाविती देहव्याधी हराया ।।
कृपादृष्टीनें त्यांसि आनंद देती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ८ ॥

जयें गोधना संकटीं रक्षियेलें ।
किती जीव अन्नोदकें तृप्त केलें ।।
बहू मंदिरें स्थापिलीं धन्य कीर्ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ९॥

बहू अज्ञ जीवांप्रती उध्दरीलें ।
तसे नास्तिकां सत्पथा लावियेलें ।।
समस्तामुखें नाम हे बोलवीती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १०॥

तनू जीर्ण झाली, बहू कार्य केलें ।
रघूनायके शीघ्र पाचारियेलें ।।
तदा रामरूपीं समाधिस्थ होती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ ११॥

समाधी पहातां समाधान होते ।
तनू कष्टवी त्यासि आनंद देते ।।
मनी भाविता कामना पूर्ण होती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १२॥

मुखें बोलवी सद्गुरू बुध्दिदाता ।
अहंभार हा वागवी कोणा मांथा ।।
जडो भावना रामदासी सदा ती ।
नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥ १३॥