प्रस्तावना – १

श्रीब्रह्मचैतन्यमहाराज गोंदवलेकर यांच्या प्रवचनांच्या संग्रहास प्रस्तावना लिहिण्यास मला मनापासून आनंद वाटतो. व्याख्यान आणि प्रवचन यांमध्ये मोठा महत्त्वाचा फरक असतो. तो असा की, व्याख्यानामध्ये विद्वत्तेचे प्रदर्शन असते, तर प्रवचनामध्ये आत्मज्ञानाचे दर्शन घडते. व्याख्यान उत्तम झाले तरी व्याख्यात्याचे खाजगी जीवन कसे आहे इकडे लोक फारसे लक्ष देत नाहीत. आपला विषय तो कसा मांडतो याकडेच श्रोत्यांचे लक्ष असते. याच्या उलट, प्रवचनकाराचे खाजगी जीवन कसे आहे, तो जे सांगतो त्यामध्ये त्याच्या जीवनाचे प्रतिबिंब पडते किंवा नाही, याकडे श्रोत्यांचे लक्ष असते. श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या प्रवचनांचे हेच मोठे वैशिष्ट्य आहे की आपल्या जीवनात ते जसे वागले तसेच ते बोलले. आपण जे आचरण करतो तेवढेच लोकांना सांगण्याचा आपल्याला अधिकार आहे असे ते नेहमी म्हणत. म्हणून या ग्रंथांतील प्रवचनांच्या मागे प्रत्यक्ष आचरणाचा मजबूत पाया आहे हे वाचकांनी ध्यानात ठेवावे. ज्यांचे बोलणे आणि वागणे एकरूप असते त्यांनाच संत म्हणतात. संतांचे जीवन भव्य असते, उदात्त असते, तसेच भगवंताच्या प्रेमाने भरलेले असते; पण या सर्वांचे मूळ आत्मसाक्षात्कारामध्ये असते, म्हणून तो साक्षात्कार कसा करून घ्यावा हा एकाच विषय संतांच्या प्रवचनात सापडतो. अर्थात या ग्रंथात संग्रहित केलेल्या प्रवचनांमध्ये आत्मसाक्षात्काराची सर्वांगीण शिकवण आढळते. सर्वांगीण म्हणण्याचा हेतू हा की, मानवी जीवनाच्या सर्व अवस्थांमध्ये, म्हणजे सामान्य प्रपंचामध्ये देखील, आत्मज्ञानाचे साधन यथासांग आचरता आले पाहिजे, असा श्रीमहाराजांचा आग्रह आहे. आत्मसाक्षात्कार होण्यासाठी अनेकांनी अनेक साधने सांगितली. त्या सर्वांमध्ये भगवंताच्या अस्तित्त्वाची जाणीव अखंडपणे टिकवणे हे सर्वोत्तम साधन होय, असे श्रीमहाराजांचे स्पष्ट मत आहे. भगवंत आहे, तो माझ्याजवळ आहे, अगदी माझ्या हृदयात आहे, अशी जाणीव मनामध्ये टिकण्यास भगवंताचे सूक्ष्म चिंतन आवश्यक आहे. असे सूक्ष्म चिंतन अर्थरूप असते. त्या अर्थाचे वाहक म्हणजे भगवंताचे नाम होय. या दृष्टीने भगवंताच्या नामस्मरणातून भगवंताचा भाव निर्माण होतो. एकदा भाव निर्माण झाला, की सर्व प्रकारचे वाद, मते व मतांतरे आपोआप लय पावतात. नाम श्रेष्ठ का? तर ते सगुण आहे तसेच निर्गुण आहे, सूक्ष्म आहे, तसेच स्थूल आहे, ज्ञान्याला चालते तसेच अज्ञान्यालाही लागू पडते, संन्याशाला समाधान देते तसेच प्रापंचिकाला तारते, इतकेच नव्हे तर अगदी लीन-दीन व्यक्तीपासून ते श्रेष्ठ व्यक्तीपर्यंत सर्वांना मायेच्या जाळ्यातून बाहेर काढणारे नाम हे एकाच साधन आहे. लग्न झाल्यानंतर ब-याच दिवसांनी गर्भार राहिलेली स्त्री आपल्या गर्भाला अति काळजीपूर्वक जपते, तसे श्रीसद्गुरूंनी दिलेल्या नामाचे जतन केल्यास याच जन्मामध्ये भगवंताचे सान्निध्य खात्रीने अनुभवास येते, असे श्रीमहाराजांचे प्रतिज्ञापूर्वक सांगणे आहे.

श्रीमहाराज लौकिकदृष्ट्या ग्रंथ पढलेले नव्हते, म्हणून त्यांची भाषा ओबडधोबड वाटते. पण तिच्यामध्ये एका थोर नामसिध्द स्थितप्रज्ञाने आपल्या आत्मसाक्षात्काराचे सार ओतलेले आहे. प्रवचनांची वाणी भगवंताच्या प्रेमाने रसरसलेली असली तरी तिचे तेज शांतता व समाधान देते. सर्व प्रवचनांचे मूळ भगवत्प्रेरणेत असले तरी प्रसंगोपात्त लौकिक परिस्थितीचे व व्यवहाराचे विवेचन मधून मधून डोकावते. वास्तविक श्रीमहाराजांनी मोठा लोकसंग्रह केल्यामुळे त्यांच्या नजरेतून व्यवहाराची कोणतीही बाजू सुटलेली नाही. परंतु व्यवहार सांगताना देखील त्यांचे अंतिम लक्ष भगवंताकडे म्हणजे जीवनाच्या शाश्वत तत्त्वाकडे होते. देहाहून आपण भिन्न आहोत, आपण भगवत्स्वरूप आहोत हे ओळखणे म्हणजे जीवन सफल होणे अशी त्यांची ठाम भूमिका असल्यामुळे प्रत्येकाने आपला प्रपंच व त्यातील सर्व कर्मे भगवंताच्या पार्श्वभूमीवर करावीत असे ते वारंवार सांगत. देहापूजेला सर्वस्व मानणा-या विसाव्या शतकातील सुशिक्षितांना आत्मज्ञानाच्या भूमिकेवर उचलून उभे करण्याचा प्रचंड खटाटोप त्यांनी जन्मभर केला. मानवी देहाला जीवनात मोठे महत्त्व आहे, पण ते भगवंताचे साधन म्हणून आहे, ही दृष्टी ठेवून देहाला चांगले खायला-प्यायला घालावे, त्याला सुखोपभोग द्यावे, त्याला बलवान ठेवावे, पण केवळ तेवढे करण्यासाठी जगणे, म्हणजे भगवंताला विसरून जगणे हे पाप आहे असे श्रीमहाराजांचे सांगणे आहे.

श्रीमहाराजांचे व्यक्तिमत्त्व अनन्यसामान्य होते, म्हणून त्यांचे बोलणे सगळे एकदम कळणे अशक्य आहे. जो साधन करील त्याला मात्र त्यांच्या वाणीतून आपोआप प्रकाश मिळेल,. या जगात एका भगवंताशिवाय सर्वस्वी नवीन असे काय आहे? त्या भगवंताच्या नामाचे चिंतन हजारो भक्तांनी करून सुद्धा तो पुन्हा नवीन व ताजा आहे. अर्थात भगवंताचे नाम जितके जुन्यात जुने तितकेच ते नवीनात नवीन आहे. त्या नामाचे महत्त्व सांगताना श्रीमहाराजांच्या अक्षराअक्षरातून भगवंताचा भाव निथळू लागतो आणि ऐकणा-याला किती सांगू आणि किती नको असे त्यांना होऊन जाते. विश्वातील जीवनात ओतप्रोत भरलेला भगवंत मनुष्यमात्राने नामस्मरणाने पाहावा व आपले जीवन आनंदमय बनवून टाकावे, असा श्रीमहाराजांचा अट्टाहास आहे. श्रीमहाराजांच्या अंगी द्रष्टेपण होते. चालू काळाला तसेच पुढे येणा-या काळाला आपल्या विशाल दृष्टीने ओळखून आत्मज्ञानाचे साधन सांगणारा पुरुष द्रष्टा. ते साधन म्हणजे नाम होय. नाम स्वयंभू आहे, शक्तिरूप आहे; त्यामध्ये भगवंताची दिव्य शक्ती साठवलेली असल्याने नामाने वासना जिंकता येते. नामामध्ये गुरुकृपा व भगवत्कृपा यांचा समावेश होतो. नाम निश्चयाने घ्यावे पण प्रेमाने घ्यावे; नियमाने घ्यावे पण मनापासून घ्यावे; उत्साहाने घ्यावे पण चिकाटीने घ्यावे. नामाला नीतीची सदाचरणाची व कर्तव्याची जोड द्यावी. असा धीर धरून नामाचा अभ्यास करणा-यास आज ना उद्या साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही, असा श्रीमहाराजांचा आशीर्वाद आहे.

श्री गोखले स्वतः साधक वृत्तीचे आहेत. त्यांनी अत्यंत परिश्रम घेऊन श्रीमहाराजांच्या प्रवचनांचा हा संग्रह लोकांसमोर ठेवला आहे. त्यामुळे साधकांची फार सोय होईल यात शंका नाही. या पुण्यकर्माने त्यांचे चित्त नामांत अधिकाधिक रंगून जावो हीच माझी श्रीसद्गुरूचरणी प्रार्थना आहे.

कृष्णबाग, मालाड

मुंबई, ती- १२-११-६६

 के. वि. बेलसरे