हाचि सुबोध गुरूंचा

नाम सदा बोलावे, गावे भावे, जनांसि सांगावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, नामापरते न सत्य मानावे ॥१॥

नामात रंगुनीया व्यवहारी सर्व भोग सेवावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भोगासंगे कुठे न गुंतावे ॥२॥

आंनदात असावे, आळस भय द्वेष दूर त्यागावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, अनुसंधाना कधी न चुकवावे ॥३॥

गोड सदा बोलावे, नम्रपणे सर्वलोकप्रिय व्हावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भक्तीने रघुपतीस आळवावे ॥४॥

स्वांतर शुद्ध असावे, कपटाचरणा कधी न वश व्हावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मन कोणाचे कधी न दुखवावे ॥५॥

’माझा राम सखा, मी रामाचा दास’ नित्य बोलावे ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, रामपाशी अनन्य वागावे ॥६॥

यत्न कसून करिन मी, यश दे, रामा, न दे तुझी सत्ता ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मानावा राम सर्वथा कर्ता ॥७॥

आचार संयमाने युक्त असा नीतिधर्म पाळावा ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, खेळाएसा प्रपंच मानावा ॥८॥

दाता राम सुखाचा, संसारा मान तू प्रभूसेवा ।

हाचि सुबोध श्रीगुरुंचा, संतोषा सर्वादा मनी ठेवा ॥९॥

स्वार्थ खरा साधा रे, नित्य तुम्ही नामगायनी जागा ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मीपण जाळोनिया जगी वागा ॥१०॥

अभिमान शत्रु मोठा सर्वाना जाचतो सुखाशेने ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, मारावा तो समूळ नामाने ॥११॥

राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धन मान ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, भंगावे ना कदा समाधान ॥१२॥

प्रेमात राम रमतो, प्रेमाला मोल ना जगामाजी ।

हाचि सुबोध श्रीगुरूंचा, गुरुरायाला तहान प्रेमाची ॥१३॥